अनेकदा तोंडामध्ये, जिभेवर लालसर चट्टे पडतात, कधी जखमा हि होतात. त्या भागामध्ये इरीटेशन होत, त्यालाच आपण तोंड येणं (mouth ulcers) असे म्हणतो. आपल्याला कधी ना कधी असा त्रास होत असतो. आयुर्वेदामध्ये याला मुखपाक असे म्हणतात. अगदी छोटासा चट्टा जर असेल तर काही उपाय न करताही ३-४ दिवसांमध्ये तो आपोआप बरा होऊन जातो. पण काहींना तोंड येण्याचा त्रास हा प्रचंड प्रमाणात होतो.
तोंडात अनेक ठिकाणी फोड आल्यामुळे प्रचंड दाह तर होत असतो आणि खायला, पाणी प्यायला ही त्रास होतो. अशावेळी आपल्याला काही उपाय करणे गरजेचे असते जेणेकरून आपला त्रास कमी होईल. या लेखामध्ये तुम्हाला तोंड आल्यावर करण्यासाठी प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय वाचायला मिळतील. म्हणून तुम्हालाही तोंड येण्याची तक्रार उद्भवत असेल तर लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
तोंड येणे म्हणजे काय ?
तोंड येण्याचे आपण साधारणपणे तीन प्रकारात विभाजन करू शकतो. पहिला प्रकार म्हणजे गालाच्या आतल्या भागाला चट्टे वगैरे येतात, जखम होते याला स्टोमायसीस म्हणतात. दुसरे म्हणजे जिभेवर चट्टे पडतात त्याला ग्लोसाइटिस असे म्हणतात. यामध्ये जिभेवर जखमा होतात. तिसरा प्रकार म्हणजे हिरड्यांमधून, हिरड्यांच्या आजूबाजूला चट्टे पडतात जखमा होतात कधीकधी हिरड्यांमधून रक्त सुद्धा येते याला जिंजीवायटीस असं म्हणतात.
तोंड येण्याची कारणे –
कोणताही आजार कशामुळे होतो, याचे कारण जर आपल्याला माहीत असेल तर त्या गोष्टी आपण आधीच टाळू शकतो. किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर आधीच उपाययोजना करू शकतो. म्हणजे तो होणारा आजार आपण नक्कीच टाळू शकतो. इथे आपण तोंड येण्याची कारणे बघणार आहोत. तुम्हाला जर वारंवार तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तो कशामुळे होत आहे हे या कारणावरून तुम्ही ओळखू शकाल.
1. तोंड येण्याचे सर्व सामान्य कारण म्हणजे शरीरात असलेली उष्णता, तर आपल्या शरीरात उष्णता कशामुळे वाढते ? आपल्या शरीरात अन्नाचे पचन हे जठरामध्ये होत असतं, जेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा या जठरामध्ये अग्नी प्रज्वलित होतो. अशावेळी जर आपण जेवण केलं नाही किंवा अति मसाल्याच, अति तिखट पदार्थाचं सेवन केलं. असं आपण अनेक वर्षांपासून करत असलो, तर आपल्या शरीरातील उष्णता वाढत जाते. आणि हे उष्णता आपल्या पोटातच साचत जाते. आणि मग तोंड येण्याच्या माध्यमातून बाहेर पडते.
2. पचनाचा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तोंड येऊ शकतं. पोट व्यवस्थित साफ होत नसेल शरीरातील विषारी घटक शौचच्या माध्यमातून शरीराबाहेर जात नसतील तर त्यामुळे ही शरीरात उष्णता जमा होते आणि त्याचा परिणाम म्हणून तोंड येतं.
3. अनेकदा विटामिन बी 12 च्या अभावामुळे ही तोंड येतं. इतर जीवनसत्त्वांच्या अभावामुळे ही तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो.
4. रात्रीचे जागरण करणे पुरेशी झोप न घेणे यामुळे अपचन ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात आणि तोंड येते.
तोंड आल्यावर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय –
जास्त प्रमाणात तोंड आल्यावर होणारा त्रास हा असहनीय असतो. या वेदना आपण काही सोपे घरगुती उपाय करून घालवू शकतो. चला तर मग बघूया तोंड आल्यावर त्वरित आराम देणारे घरगुती उपाय.
1. तोंड आलेल्या जागी म्हणजे जिथे चट्टे तत्व आहेत तेथे बोटाने थोडे तूप लावावे आणि हे लावल्यानंतर काही वेळ असेच राहू द्यावे पाणी वगैरे पिऊ नये म्हणजे ते त्या भागावर आपले काम करू शकेल.
2. तोंड आलेल्या ठिकाणी मध लावणे फायद्याचे ठरते. यामुळेही आराम मिळतो. हे सुद्धा लावल्यानंतर थोडा वेळ असेच राहू द्यावे त्यानंतर थोडा वेळ काही खाऊ पिऊ नये.
3. ३ ते ४ चमचे मध घ्या यामध्ये १ चमचा हळद टाका हे मिश्रण तोंडात ठेवा जोपर्यंत तुम्ही ठेवू शकता तोपर्यंत तोंडात ठेवा नंतर बाहेर टाकून द्या याला आयुर्वेदामध्ये ‘कवल ग्रह’ असे म्हणतात. हे केल्यावर १५ ते २० मिनिटात पाणी पिऊ नका तसेच काही खाऊ नका जेणेकरून या मिश्रणाची ॲक्शन त्या भागावर होईल. यामुळेही लवकर आराम मिळतो असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा.
4. ताकाने दिवसातून दोन वेळा गुळण्या केल्याने ही आराम मिळतो.
5. पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात आणि अनेक विटामिन सुद्धा असतात. ही पेरूची पाने तुम्ही खाऊही शकता किंवा याचा काढा बनवून त्याच्या गुळण्याही करू शकता. पेरूची दोन पाने तुम्ही चावून चावून खाल्ल्याने तोंड येण्यामध्ये आराम मिळतो. काढा बनवण्यासाठी पेरूची पाने बारीक बारीक करून एक ग्लास पाण्यामध्ये टाकून चांगले उकळून घ्यावे थंड झाल्यावर त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यानेही आराम मिळतो.
6. तुळशीच्या पानांमूळे सुद्धा तोंड येण्यामध्ये आराम मिळतो. चार ते पाच तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्या आणि ही चावून चावून खा. तिच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात तसेच भरपूर विटामिन कॅल्शियम फॉस्फरस पण असतात. त्यासोबतच तुळस ही पचन सुधारण्यास आणि जखमा बरे करण्यामध्ये सुद्धा फायदेशीर असते.
7. वारंवार तोंडे असेल आणि उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही गुलकंद खाणे फायद्याचे ठरते. सकाळी आणि संध्याकाळी १-१ चमचा गुलकंद तुम्ही घेऊ शकता. हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा एक कप कोमट दुधासोबतही घेऊ शकता.
8. तुरटीची पावडर किंवा ड्युटीचा छोटासा तुकडा घेऊन तोंड आलेल्या जागी लावला तरी आराम मिळतो. कारण तुरटी ही अँटीसेप्टिक असते. पण तुरटी लावल्यावर त्या जागेवर इरिटेशन होत. म्हणून तुम्हाला सहन होत असेल तरच हा उपाय करा.
9. शरीरातील उष्णता कमी कमी करण्यासाठी भरपूर पाणी नारळ पाणी ताक यांचे सेवन करा. तोंड आले असेल तेव्हा अति चहा कॉफी अति तिखट मसालेदार तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा. हे पदार्थ खाल्ल्याने त्रास अधिक वाढू शकतो.
10. तोंड आल्यावर ४ते ५ दिवस ब्रश वापरू नका. त्यासाठी माऊथ वॉश किंवा कडुलिंबाच्या काडीने तुम्ही दात घासू शकता.
जर तुम्हाला तोंड येण्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्हाला आतड्यांचे रोग असू शकतात किंवा काही तरी दुसरा प्रोब्लेम असू शकतो. म्हणून नेहमी असा त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवलेच पाहिजे आणि त्यावर कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे. वर सांगितलेले उपाय हे तुम्ही कधी कधी तोंड आल्यावर आराम मिळण्यासाठी करू शकता. साधारण प्रॉब्लेम असेल तर या उपायांनी त्रास नक्कीच कमी होईल. पण हे करून देखील आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे.
समारोप –
तर मित्रांनो आज या लेखामध्ये आपण तोंड आल्यावर करण्यासाठी प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय बघितले. तोंड येणे म्हणजे काय ? तोंड येण्याची कारणे कोणती असतात तेही आपण बघितले. तुमचे काही प्रश्न असतील किंवा सजेशन असतील ते मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक आरोग्य विषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!